निसर्ग मानवाचा सखा, सोबती !

   
      निसर्ग म्हणजे काय ? असा प्रश्न अनेक वेळा मानवी मनात निर्माण होत असतो. पण निसर्ग म्हणजे नेमके काय? असा प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला वाटत निसर्ग म्हणजे मानवाचा मित्र, सखा, सोबती आहे. जसे कि अनेक अंगांनी फुलणारा, उमलणारा, मानवी जीवनात उन्मेष भरणारा हा सखा निसर्ग. सतत बदलणारा, बदलवणारा, प्राण्या – पश्यांनी बहरलेला हा सखा निसर्ग, संवेदनांना रिझवणारा, चांगल्या विचारांना चालना देणारा ...फक्त देणारच, काही न मागणारा, हा सखा निसर्ग !
     निसर्ग मानवाला जगण्याची उमेद येतो, मन प्रसन्न करण्यासाठी वाऱ्याबरोबर सुगंध पसरवणारा, झाडाझाडांमधून बासरी वाजवणारा, सूर्यकिरणांनी उबदारपणा  देणारा आणि चंद्राची शीतलता पसरवणारा हा सखा म्हणजे निसर्ग. त्याचं कौतुक करावं तेवढ थोडंच पाण्याबरोबर वाहणारा आणि  पक्ष्यांमधून बोलणारा, स्वत:ची प्रौढी न मिरवता सारं शांतपणे सहज करणारा सखा.
    इतका चांगला मित्र मिळूनही माणूस स्वत: ला पोरका का समजतो ? तुम्ही निराश झालात, उव्दिग्न झालात तरी तो तुम्हाला शांत करतो कधी कधी जंगलात जाऊन एकटं बसलं की मन शांत शांत होतं आणि विचार येतो आपल्या जीवनाच्या प्रयोजनाचा.
     निसर्गाच्या सान्निध्यात या प्रयोजनाचा मी अभ्यास करू लागतो. इतरांचं मी काय सांगू ? पण माझ्या आयुष्याला काही प्रयोजन होतं का ? किंवा आहे का ? का हे सारंच सृष्टीचक्र माझ्यासह  प्रयोजनशुन्य आहे. असं असणं कसं शक्य आहे. कसलाच हेतू न ठेवता हे चाललं असावं काय? माझ्या जगण्यालाही हेतू नसावा काय ? आणि जर हेतू अथवा प्रयोजन असेल तर ते काय असेल? धर्मग्रंथांनी, विव्दानंनी धर्मगुरूंनी याबद्दल अनेक वेळा भाष्य केलं असेलही ; पण मी निसर्गासोबत याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला काही उत्तरे आपोआपच मिळू लागतात. काही तरी दुसऱ्यांना देत रहावे हिच तर इतिकर्तव्यता नसेल? समोर पाहिलं तर शांतपणे वाहणारी नदी, फळा-फुलांनी बहरलेली झाडं, लांबवर पसरलेली हिरवळ सजीव सृष्टीला काहीतरी देतच आहे. काहीही मागत नाहीत. कसलीच अपेक्षा करत नाहीत. ती एकमेकांवर अवलंबून असतीलही; पण त्याचा गाजावाजाच ती करत नाहीत. गाजावाजा न करता निरपेक्षपणे देत राहणं, अखंडितपणे देत राहणं हेच निसर्ग शिकवतोय. ‘वाण नाही तर गुण लागला पाहिजे’ अशी मराठीत म्हण आहे. निसर्गाशी गट्टी करून तो गुण घेता येईल का आपणाला. जसे मराठीत आणखी एक म्हण प्रसिध्द आहे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण एक दिवस घेणाऱ्याने देणार्याचे हात घ्यावेत.
    या म्हणी प्रमाणे निसर्ग आपल्याला किती देतो आपणही निसर्गला काही तरी दिले पाहिजे ना.... ! जसे कि, निसर्गाचे सुंदररूप टिकवून ठेवण्यासाठी झाडे तोडण्या ऐवजी नवीन झाडांची लागवड केली पाहिजे. त्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात अजूनच भर पडेल. 





Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj