आत्मविश्वास
प्रत्येक
माणूस मुलत: चांगलाच असतो. एखाद्या गोष्टीची स्वत:मध्ये उणीव असणे म्हणजे आपण
पूर्णत: वाईट असणे नव्हे. ज्या गोष्टी आपणाला येतात त्या इतरांना येतातच असे नाही.
त्याचप्रमाणे इतरांना येणारी प्रत्येक गोष्ट आपणाला यायलाच हवी असेही नाही जसे
त्यांना इंग्रजी छान येते, पण आपल्याला इंग्रजीत गप्पा मारता येत नाहीत, पण
उत्कृष्ट पोहता येते, आपणाला जी गोष्ट इतरांसारखी येत नाही ती प्रयत्नपूर्वक सराव
करून करता येते. संगीतकाराला जसा नियमित रियाज करावा लागतो, खेळाडू जखमांच्या
वेदना सहन करूनही सराव करतो. याप्रमाणे आपणालाही अशक्य असणारी गोष्ट मिळवता येते.
यासाठी आपण कमी आहोत, अशी अपराधीपणाची भावना नको.
आपण जसे
आहोत तसा आपला स्वीकार करण हे कणखर मनाचं लक्षण आहे. स्वत: वरचा स्वत: करत
असलेल्या कार्यावरचा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास, आत्मविश्व ही मनाची शक्ती आहे.
आपलं जीवन आनंदी करणारा व्यक्तिमत्वाचा आत्मविश्वास कणा आहे. इतरांनी आपणाला किती
मोठं म्हणावे यापेक्षा आपण स्वत:ला किती मौल्यवान मानतो, यावर आपला आत्मविश्वास
अवलंबून असतो. आत्मविश्वास जसा दुबळा असतो तसा अवस्तावही असू शकतो. काही वेळा आपल्याबद्दल,
आपल्या क्षमतांबद्दल, आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल इतरांनी नकारात्मक मत मांडले कि,
आपणही आपल्या मनात, वागण्यात बदल करतो. आपण विचार करताना इतरांचे मत निरखून –
पारखून घ्यायला नको ? इतरांच्या मतांचा अंधपणे स्वीकार केला तर आपल्या गाडीचा
ड्रायव्हर कोण ? आपण की लोक ?
इरादों में भर दो इतनी जान कि,
हर कामयाबी मंजूर हो जाये l
बालपणापासून
व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, कौटुंबिक वातावरण, सातत्याने हरण्याचा विचार करणाऱ्या
मित्रांचा सहवास अशा अनेक गोष्टींचा परिणाम मुलांमधील न्यूनगंड वाढवितात.
इतरांच्या मताला अवाजवी किंमत देणाऱ्या व्यक्ती स्वत:च स्वत:ला विविध प्रकारची
नकारात्मक लेबलं चिकटवत राहतात. अमिताभ, जॅानी लिव्हर अशा अनेक चित्रपटांतील
नायकांनी स्वत:च्या शारीरिक व्यंगाचे रुपांतर स्वत:च्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यात
केले आणि सिनेमासृष्टी गाजविली. आपल्या ज्ञानातील, कौशल्यातील, व्यक्तिमत्त्वातील,
सवयीमधील त्रुटी आपणाला मेहनत घेऊन बदलता येतात. जसं वाढलेलं वजन व्यायामाने,
योग्य आहाराच्या नियोजनाने कमी करता येते त्याच पद्धतीने कोणत्याही इयत्तेत कच्चा
असणारा गणित, इंग्रजी असे विषय पक्के करता येतात.
'तुला जमणार
नाही’ असं कोणीही म्हटलं, की आपणाला ते सहज मान्य होते. एखाद्याचं आपल्याबद्दलचे
ते मत म्हणजे चिरंतन काळ्या दगडावरची रेष असू शकेल ? आपण प्रथम स्वत: वर विश्वास
ठेवायला लागलो, कि लोक आपल्यावर आपोआपच विश्वास ठेवायला लागतात. म्हणून आपण आपल्या
सुप्त क्षमतांची ओळख वाढवूया म्हणजे न्यूनगंड पळून जाईल अन आत्मविश्वास वाढेल.