DnyanMudraa (Publication 2016)
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी...!
आपल्या देशामध्ये इतर देशाच्या मानाने लोकसंख्या जास्त आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागही माणसांनी गजबजून गेला आहे. तरीही इतक्या प्रचंड माणसांच्या गर्दीमध्ये सुद्धा माणूस शोधावा लागत आहे, असं का? हाडामासान सगळी मानसं जरी सारखी असली तरी त्यांच्यातील वैचारिकता इतकी भिन्न आहे की, माणसांच्या गर्दीतच माणूस शोधावा लागत आहे. दुसऱ्यांसाठी मरणारी मानसं फार कमी तर दुसऱ्यांना मारणारी मानसंच सध्या जगात जास्त आहेत. नको ते पाहणारी, नको ते करणारी लोकसंख्या फार जास्त आहे. एखाद्या ठिकाणी कीर्तन असेल तर तिकडे लोकसंख्या फारच मोजकी त्याउलट कीर्तन हा शब्द उलटा वाचा त्याठिकाणी गर्दी फारच असते. मराठी वाड्मयामध्ये संतांना फार मोठे महत्त्व आहे. आज पंढरपुरामध्ये जरी संत म्हणून जाणारी संख्या फार जरी असली तरी त्यांचे आचार-विचार हे मर्यादीतच आपणाला पाहायला मिळतात. माझ्या सारख्या अज्ञान माणसानं समाजातील थोर-वडिलधारी माणसांना माणुसकी म्हणजे काय हे सांगणे म्हणजे नळानं सागराला पाण्याचं महत्त्व सांगण्यासारखं आहे. तितके जीवन माझेअजूनही झाले नाही. तितकी मानसं बघूनही झाली नाहीत. तरीही माझा हा अल्पअसा प्रयत्न आहे.
हे सांगण्यापूर्वी मला एका कीर्तनकाराची आठवण झाली. एकदा एका गावात कीर्तनकार कीर्तन सांगण्यासाठी गेला होता. कीर्तनाला फार उशीर होता. त्या कीर्तनकाराला पोस्टात जायचं होतं. कीर्तनकार तेथील एका लहान बालकाला घेऊन मला पोस्टऑफिस दाखव म्हणून घेऊन चालू लागले. चालता-चालता बालकाने महाराजांना प्रश्न केला, महाराज आपण काय सांगता? महाराज म्हणाले मी कीर्तन सांगतो. त्यावर बालक म्हणाले म्हणजे नेमकं काय सांगणार आहात. त्यावर महाराज म्हणाले मी आज माझ्या कीर्तनामध्ये मोक्षाकडे जाण्याचा मार्ग या विषयावर कीर्तन करणार आहे. त्यावर ते बालक महाराजांना म्हणाले काय महाराज तुम्हाला पोस्टाकडे जाण्याचा मार्ग ठाऊक नाही आणि मोक्षाकडे जाण्याचा मार्ग तुम्ही जगाला काय काय सांगणार. अशी माझी ही अवस्था झाली आहे. आजकालची वर्तमानपत्र सकाळी जर वाचली तर मेंदू भिन्न होतो आणि रात्री वाचली तर झोपच येत नाही. त्यामुळे न वाचालेलीच बरी.काय असतं हो या वर्तमानपत्रात खून झाला, दरोडे पडले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, विवाहित म्हणे बेपत्ता, करोडो रुपयांचा घोटाळा भलत्याच बातम्या त्यांची कल्पनाही करता येत नाही. आणि मग या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या की माणसाला विचार पडतो की कुठे गेली माणुसकी की कुठेतरी माणूस या जगामध्ये हरवला आहे की काय? काही उदाहरणे देण्यासारखी आहेत एकदा नामदेव महाराज पंगतीमध्ये जेवणाला बसले. जेवणापूर्वी देवाला नमस्कार करावा म्हणून ते ताटावरून उठले. एवढ्यात बाजूला उभ्या असलेल्या कुत्र्याने नामदेवांच्या ताटातील पुरणाची पोळी पळवली. बाकीचे लोक काठ्या घेऊन कुत्र्याच्या मागे धावू लागले. तर त्यांना थांबवत नामदेव महाराज स्वतः तुपाची वाटी घेऊन कुत्र्यामागे पळाले आणि म्हणाले हे खंडेराया कोरडी पोळी खाऊ नको मी तुझ्यासाठी तूप घेऊन आलो आहे. हे उदाहरण संत आणि माणसातील आहे.
स्वतः च्या स्वार्थासाठी फक्त माणूस जगत आहे. त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची त्याची तयारी असते. त्यासाठी तो कोणाचा जीव घेण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण हे माणुसकीला न शोभणारं पाप आहे. एकदा परमानंद महाराज नदीवरती अंघोळीला गेले होते. त्यांच्या सोबत त्यांचा शिष्यही होता. महाराजांनी कपडे काढली, पोहण्यासाठी पाण्यात डुबकी मारणार इतक्यात त्यांना पाण्यात बुडणारा एक विंचू दिसला. महाराजांनी तो विंचू आपल्या ओंजळीत घेतला विंचवाने डंक मारला. परमानंदांनी हात झटकला विंचू पुन्हा पाण्यात पडला. त्यांनी पुन्हा त्याला हातावर घेतला. विंचवाने पुन्हा डंक मारला. तरीही त्यांनी त्याला वाचवलं महाराज्यांच्या सोबत आलेल्या शिष्यानं विचारलं महाराज तुम्हाला त्यानं दोनदा चावलं तरी तुम्ही त्याला वाचवलं त्यावर महाराज्यांनी त्याला उत्तर दिलं मला चावण हा त्याचा धर्म आहे तसा त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. किती सद॒विवेक बुद्धिमत्ता नाहीतर तुम्हा सर्वांनाच माहित आहे गुजरातमध्ये फार मोठा भूकंप झाला मोठी जीवित हानी झाली. कोठ्यावधी रुपयांची वित्तहानी ही झाली. देशविदेशातून मोठी मदत झाली. स्थानिक संघटनांनी ही मदत कार्यात सहभाग घेतला खरा पण त्याठिकाणी काही वेगळेच घडले. मदतकार्य करणारा एक माणूसच एका बाईच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हिसकावत होता. बांगड्या निघेनात म्हणून त्याने शेवटी त्या बाईचा हातच कापला स्वतः च्या पिशवीत घातला आणि पुढे गेला. त्याहूनही दुसरी घटना एका मृतामध्ये एका बाईच्या अंगावर भरपूर दागिने होते. मदतकार्य करणाऱ्या पोलीसांनी महिलेची ओळख पटवा व दागिने घेऊन जाण्याची घोषणा करताच त्याठिकाणी दोन पुरुष रडत रडतच आले दोघेही ही माझी पत्नी असल्याचा दावा करत होते पण प्रत्यक्षात घटना वेगळीच होती. त्या मृत बाईचा नवरा भारतमातेच्या संरक्षणासाठी सीमेवर लढत होता तर त्याच्या बायकोवर दागिन्यांसाठी हक्क सांगत दोन पुरुष येथे लढत होते आणि असे प्रश्न समोर पहायला मिळाले की सर्वसामान्य माणूस कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्याला मदत करायचे दूरच मेलेल्या मयतावरचे लोणी खाणारे लोकच या समाजात जास्त झाले आहेत आणि मग प्रश्न पडतो तो पुन्हा माणुसकीचा. माणसानं सतत हसत राहावं दुसऱ्यांनाही हसत ठेवावं हे बाजूला ठेऊन माणूस दुसऱ्याला कोणत्या ना कोणत्या मार्गानं रडवण्याचा प्रयत्न जास्त करत असतो त्याचं उत्तम उदाहरण मी आपणासमोर मांडत आहे. एकनाथ महाराज रोज अंघोळीला नदीवर जात असत. एक दिवस एका माणसाने महाराजांना अजमावण्याचा प्रयत्न केला. एकनाथ महाराज अंघोळ करून वर आले की तो माणूस महाराजांच्या अंगावर थुंकायचा महाराज पुन्हा नदीत जायचे अंघोळ करायचे असे एकशे आठ वेळा तो माणूस महाराजांच्या अंगावर थुंकला. एकशे नवव्या वेळेला काय माहित तोंडातील थुंकी संपली की काय महाराज वर येताच महाराजांच्या पायावर त्या माणसानं लोटांगण घेतलं. महाराजांनी काय उत्तर दिलेलं आहे पहा, अरे वेड्या माझ्या पाया का पडतोस खरतर मीच तुझ्या पाया पडायला पाहिजे. तुझ्यामुळं मला एकशे आठ वेळा गंगेत स्नान करण्याचं भाग्य केवळ तुझ्यामुळच मला मिळालं त्यापलीकडेही दुसरी घटना पहा. गावातील लोकांनी तुकाराम महाराजांची गाढवावरून गावात धिंड काढली, तोंडाला काळे फासले. गाढवावर बसवलं व वाजत-गाजत वरात तुकाराम महाराजांच्या दारात आली. महाराजांना पाहून यांची बायको रडू लागली. रडणाऱ्या बायकोला सांगितलं अगं रडतेस काय मी इथं गाढवावर आरामात बसून आहे पण हे लोक नाचून थकलेत पाणी दे. या देशाला भगवान महावीरांनी चालताना असं चाला की पायाखालील मुंगी सुद्धा मरू देवू नका अशी शिकवण देलेल्या देशातच किडा-मुंगीप्रमाणे माणसे मरत आहेत. आणि मारली जात आहेत. किरकोळ कारणावरून खून होताना दिसतात, दारूला पैसे देले नाहीत म्हणून बायकोचा खून, लग्नासाठी प्रियसीचा खून काही अवधीतच असा प्रकार असेल की माणसे मारण्यासाठी परदेशातून हल्ले करण्याची लोक वेळ येऊ देणार नाहीत कारण आपलेच लोक एकमेकांचे शत्रू होऊन माणसांचा विनाश करत आहेत. हे तपासून पाहण्याची वेळ तुम्हा-आम्हा सर्वांचीच आहे.
आई, बाप, बहिण, भाऊ ही नाती विसरून माणूस स्वतंत्र जीवन पध्दतीला जवळ करत आहे आणि वेळ निघून गेल्यानंतर विचार करत बसला आहे ही जगाची म्हणण्यापेक्षा घराघराची शोकांतिका आहे. आम्ही दोघं आमची दोन दोघांचा मिळून होतो चौकोन. चौकोनातील जातात दोन उरलेल्यांचा आधार कोण? सातजन्माच्या गाठी बांधून लग्नामध्ये सर्वांचे आशीर्वाद घेणारे जोडपे उत्तरार्धात त्यांचीच मुलं स्वतःच्या आईवडिलांची वाटणी करून घेतात त्यासारखं दुसरं दुर्भाग्य त्यांच्या जीवनात काय असणार आणि ही समाजातील सत्य घटना आहे. फक्त मी मोठा झालो पाहिजे स्वतःच्या आजूबाजूला कोण आहे हे बघण्यासाठी माणसाला वेळ शिल्लक राहिलेला नाही. परिस्थिती नसतानाही मुलगा हुशार म्हणून नवरा नसतानाही जगाची मोलमजुरी करून शाळा शिकवली. पोरगा ही हुशार. परदेशात जाण्याची संधीही त्याला मिळाली. परदेशात असतानाच आई आजारी पडली. थोरल्या भावानं परदेशात कळवलं आई आजारी आहे येऊन जा. तिकडून मेल आला दादा सध्याच मला दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली आहे. मला रजा नाही आईची काळजी घे काय लागलं तर कळव. थोरला भाऊ समजून गेला. पंधरा दिवस गेले आई वारली शेजाऱ्यांनी फोन केला. मुलग्याच उत्तर काय आहे हे नीट बघा, दादाला सांगा माझं प्रमोशन होणार आहे. अशी संधी परत येणार नाही. माझी काय वाट बघू नका. आईच्या उत्तरकार्याची व्हिडीओ कॅसेट काढा. मी आल्यानंतर बघीन आणि जो काही खर्च असेल तो नंतर पाहू. याच मायभूमीमध्ये स्वत: च्या आईवडिलांच्या हट्टासाठी कावड करून काशीयात्रा करणारा महान श्रावणबाळ एकेकाळी होता तर या युगात हा स्वत: च्या आईच्या उत्तरकार्याची व्हिडीओ शुटींग पाहणारा नवीन श्रावण जन्माला आला आणि हीच तफावत पुढे वाढत गेल्यास या पृथ्वीवरील मानव जातीचा विनाश फार दूर नसेल.
असं वाटत दान देण्याचीही प्रवृत्ती असावी लागते. काय द्यावे आणि काय घ्यावे हे माहित असावे. दुसऱ्याने वाईट जरी दिले तरी त्याच्याच वाईटातून त्याला चांगल काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी हा अतिशय कोवळा पोरगा ज्ञान सांगायचा. गावभर रोज भिक्षा मागायचा. आपली भिक्षा ज्यांना अन्न मिळत नसेल त्यांना वाटायचा. हा त्याचा नित्यक्रम होता. एक दिवस अशीच भिक्षा मागता मागता एका घरात भिक्षा मागताना एका बाईनं स्वामींना घरसारवानाचा पोतेरा फेकून मारला आणि म्हणाली उद्यापासून माझ्या दारात पुन्हा भिक मागू नकोस. स्वामींनी शांतपणे तो पोतेरा उचलला नदीपात्रात स्वच्छ धुतला , सुकवला आणि त्याच्या वाती करून ज्या बाईनं तो पोतेरा फेकून मारला होता तिच्या अंगणात रात्री त्या वातीच्या ज्योती पेटवून तो परिसर उजळला त्या बाईनं त्या स्वामींची क्षमा मागितली आणि या सगळया गोष्टीचा बारकाईने विचार केला तर आजच्या समाजामध्ये माणूस शोधण्याचीच वेळ येवून बसली आहे. माणूस – माणूस म्हणजे काय ? देवाने माणसाला फार मोठी वैचारिक बुद्धिमत्ता दिली आहे त्याच्या जोरावरच माणूस या पृथ्वीवर राज्य करू लागला असला तरी त्याला माणूसपण शोधता आलेलं नाही. जो माणूस दुसऱ्याच्या आनंदानं खळखळून हसतो तो माणूस. जो दुसऱ्यावर भरभरून प्रेम करतो तो माणूस. जो दुसऱ्याची तोंडभरून स्तुती करतो तो माणूस. महाराष्ट्र जरी संतांची भूमी म्हणून प्रचलित असली तरी या थोर पुरुषांनी जी जनतेला शिकवण दिली त्याचा माणसाला विसर पडत चालला आहे. समाजात होत असलेल्या बदलांना माणूस बळी पडत चालला आहे.आपण जी भौतिक परिस्थिती म्हणतो ती इतक्या झपाट्याने बदलत चालली आहे की या संतांनी घालून दिलेल्या सीमारेषा माणसाने कधी पार केल्या हे कळलेसुद्धा नाही. जुन्या परंपरांना मागे टाकून प्रगती करणे योग्य जरी असले तरी यातून आपण काय साध्य केले हे पाहणे गरजेचे आहे. आपण कितीही बदलण्याचा प्रयत्न जरी केला तरी माणूस बदलायचा असेल तर त्यांना संतमार्गानेच जावे लागेल नाहीतर या युगातच माणूस शोधायची जी वेळ आलेली आहे ती भविष्यकाळातील फार मोठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
........Narayan Mahadev
Mangale.
Sule,Ajara,Kolhapur
Maharashtra.