Late Hon. Babasaheb Kupekar



गडहिंग्लजचा विकासपुरुष : स्व. बाबासाहेब कुपेकर
कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यांतील कानडेवाडीचे बाबासाहेब कुपेकर म्हणजे कृष्णराव रखमाजीराव देसाई, खऱ्या अर्थाने विकासपुरुष होते. राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष या नात्याने त्यांनी भारतात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली होती आणि त्यांच्या या कामगिरीचा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुरस्कार देऊन गौरवही केला होता.

राजकीय प्रवास :
स्व. बाबासाहेब कुपेकर हे विकासाचे प्रणेते होते. शालेय जीवनापासून त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाचळवळीत भाग घेतला होता. त्यावेळी दहावीत बेळगावच्या शाळेत शिकत असताना कलेक्टरसमोर निदर्शने केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तर शरद पवारांसोबत सीमाचळवळीत भाग घेऊन आंदोलन केल्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. सीमा प्रश्नासाठी आंदोलन करणार्यांना ते नेहमीच साथ देत. या प्रश्नाच्या संदर्भात ते सर्वोच्च न्यायालयांतील खटल्यांचा पाठपुरावासुद्धा करीत.
वयाच्या 23व्या वर्षी ते कानडेवाडीचे सरपंच झाले. ते प्रदेशकाँग्रेसचे सरचिटणीसही होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी जिल्हा परिषद गाजवली. ते चारवेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. कृषी आणि सहकार खात्याचे ते सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात दोनशेहून अधिक दुग्धसंस्थांची नोंदणी झाली. 1975 ते 87 मध्ये ते जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते होते. दौलत सहकारी कारखान्याचे संचालकपद त्यांनी भूषविले होते.
स्व. बाबासाहेब कुपेकरांचे वैशिष्टय़ म्हणजे ते चारही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. या चार काँग्रेस म्हणजे काँग्रेस एस, समांतर काँग्रेस, इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. या चारही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे ते एकमेव नेते होते.

बाबासाहेबांची कायें व योगदान :
राज्याच्या सहकार, कामगार, उद्योग, कृषी  क्षेत्रात तसेच आपल्या मतदारसंघातही त्यांनी उल्लेखनीय कागगिरी केली. विकासाचे नेतृत्व आर्थिक प्रगतीतून त्यांनी खऱ्या अर्थाने समृद्ध केले.
गडहिंग्लज-आजरा-चंदगड-गारगोटी येथील रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालय मंजूर करून आणले. स्व. बाबासाहेब कुपेकरांची दुसरी उल्लेखनीय कामगिरी म्हणजे संपूर्ण भारतात सर्वप्रथम अंगणवाडीसारखा प्रकल्प गडहिंग्लज तालुक्यासाठी राबविला. उर्दू शाळा काढली.  तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतीचे वर्षाला एक लाख रुपये वाचवून 16 कोटी रुपयांचा सोलार-पवन पथदीपप्रकल्प संपूर्ण भारतात त्यांनी प्रथमच राबविला.
विकासातून प्रगती प्रत्यक्षात कशी आणायची हे त्यांनी घटप्रभा नदीवर मौजे तावरेवाडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून दहा ते बारा गावांतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून अधोरेखित केले. शेतीसाठी आणि पिण्यासाठी कोरडवाहू भागात पाणी उपलब्ध करून दिले. आजरा-गडहिंग्लज-संकेश्वरसाठी वरदान ठरलेला चित्री प्रकल्प बाबासाहेबांनीचं मंजूर केला. अनेक पाझर तलावांची सिंचनक्षमता वाढवली. आपल्या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण केले. ऐतिहासिक आणि जुन्या मंदिर, स्मारकांचे नूतनीकरण करून त्यांचा विकासही त्यांनी घडवला. अनेक मंदिरांना चांगले आर्थिक सहाय्य मिळवून दिले.
गोरगरीब वर्गासाठी हृदय, कर्करोग, मेंदू वगैरेंच्या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सोयी उपलब्ध करून दिल्या असे होते आमच्या गडहिंग्लजचे विकासपुरुष स्व. बाबासाहेब कुपेकर...

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj