Sugarcane Farming Guide

एकरी 100 टन उसासाठी व्यवस्थापन :
ऊसाच्या चांगल्या वाढीसाठी मध्यम ते भारी स्वरूपाची जमिन असावी. माती परीक्षण करुन घ्यावे त्यानूसार जमिनीचा प्रकार,सामू व इतर उपलब्ध अन्नद्रव्ये याची तपासणी करून घ्यावी आणि त्यानूसार खतांचे नियोजन करावे. को-86032, को-94012, को-671 इत्यादी जातींचा वापर करावा.
ऊस उत्पादन वाढीसाठी शेतक-यांनी आता जातींची निवड, जमिनीची मशागत, योग्य लागवड पद्धत, खत व्यवस्थापन या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उस पिकाच्या लागवड करताना जमिनीचा विचार करणे आता गरजेचे आहे. ऊस पिकास मध्यम, काळी ते भारी उत्तम पाण्याचा निचरा असणारी जमीन योग्य आहे. या पिकाची मुळे 1 ते 1.5 मीटर खोल जातात. मध्यम पोताच्या आणि 60 टक्‍क्‍यांपेक्षा जादा जलधारणाशक्ती असणा-या, सामू 6.5 ते 8.5 टक्के, क्षाराचे प्रमाण 0.5 पेक्षा कमी, चुनखडीचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी, तसेच उपलब्ध अन्नद्रव्यांचा साठा भरपूर असावा.

पूर्व मशागत व सेंद्रिय खते –
प्रथम जमीन खोल, उभी आडवी नांगरावी. नंतर 20 ते 25 टन अथवा 40 ते 50 बैलगाड्या प्रति हेक्‍टरी शेणखत अगर कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. सेंद्रिय खत उत्पादनाच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे आहे तितकेच जमिनीच्या जैविक आणि भौतिक सुपीकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शेणखत अथवा कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ऊस पीक लावण्यापूर्वी त्या जमिनीत हिरवळीचे पीक घेणे महत्त्वाचे आहे. उदा. ताग, धैंचा यांसारखी पिके घेऊन पीक फुलावर आल्यावर म्हणजेच दीड महिन्यांचे पीक झाल्यावर ते जमिनीत गाडावे. यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढल्याने, तसेच हेक्‍टरी 80 ते 90 किलो नत्र पिकास उपलब्ध होते. उसाचे पाचट शेतात कुजविल्यास ऊस पिकास चांगला फायदा होतो व त्यामुळे ऊस उत्पादनात वाढ झालेली आढळून आलेली आहे.

लागण व बीजप्रक्रिया –
नांगरटीनंतर कल्टीवेटरच्या साह्याने मशागत करावी. नंतर लोड फिरवून जमीन सपाट करावी. रिजरच्या साह्याने जमिनीच्या प्रकारानुसार 90, 100 किंवा 120 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून रान फावड्याने बांधून घ्यावे. लांब स-यांमुळे शेतात पाणी चांगले देता येते. रान बांधल्यावर लागण करावी. उसाची लागण दोन पद्धतींनी करता येते – ओली लागण – हलक्‍या मध्यम जमिनीत करावी. कोरडी लागण – भारी जमिनीत करावी. दोन डोळ्यांच्या टिपरीचा वापर करावा. बेणे योग्य खोलीवर लावल्यास 10 ते 20 दिवसांत उगवण पूर्ण होते. पहिल्या दोन-तीन पाण्याच्या हलक्‍या पाळ्या द्याव्यात. त्यामुळे कांड्या उघड्या पडून नांग्या पडणार नाहीत.

ऊस लागवड तीन हंगामामध्ये करता येते आपणास कोणता हंगाम योग्य आहे त्यानुसार लागवड करावी.
१) आडसाली – ऑगस्ट
२) पूर्वहंगामी – ऑक्टोबर – नोव्हेंबर
३) सुरू – जानेवारी
– पाणी उपलब्धता पाहून लागवड करावी.
सुरू हंगामात उसाचे सरासरी उत्पादन 128 मे. टन, तर साखरेचे उत्पादन 19.74 मे. टन/हे. मिळालेले आहे. पूर्व हंगामात उसाचे सरासरी उत्पादन 139 मे. टन/हे., तर साखर उत्पादन 20.07 मे. टन/हे. मिळालेले आहे.

दोन डोळा टिपरी –
दोन डोळ्यांची टिपरी तयार करताना वरचा भाग 1/3 व खालचा भाग 2/3 ठेवावा. टिपऱ्या बनविताना धारदार कोयता वापरावा. टिप-या सरीत लावताना दोन टिपऱ्यांतील अंतर 15-20 सें.मी. ठेवून दोन्हीही डोळे बाजूस राहतील अशा बेताने लागण करावी. दोन डोळा पद्धतीने 35 टक्के बेणे व खर्चात बचत होते. तोडणीपर्यंत एक चौरस फुटात 1 ऊस याप्रमाणे 40 आर (एक एकर) क्षेत्रात 45 ते 50 हजार ऊस जोपासता येतात.

तीन डोळा पद्धत –
या पद्धतीमध्ये बेणे जास्त लागते. खर्च जास्त येतो. फुटवे जास्त असल्याने एक एकर क्षेत्रात 45 ते 50 हजार ऊस जोपासता येत नाहीत.

एक डोळा पद्धत –
ही पद्धत आडसाली व पूर्वहंगामास उपयुक्त आहे. एक डोळा पद्धतीने प्लॅस्टिक पिशवीत ऊस रोपे तयार करून वापरता येतात. या पद्धतीने उसाच्या बेण्याची बचत जवळजवळ 66 टक्के करता येते.

बेणे प्रक्रिया-
उसाच्या लागणीपूर्वी बेणे कार्बेन्डॅझिम किंवा बाविस्टीन 0.1 टक्का द्रावणात (10 ग्रॅम कार्बेन्डॅझिम 10 लिटर पाण्यात) 10 ते 15 मिनिटे बुडवून ठेवावे. बेण्याला खवले अगर पिठ्या किडीचा उपद्रव असल्यास उसाचे बेणे मॅलॅथिआन 50 ईसी 300 मि.लि. किंवा डायमिथोएट 30 ईसी 250 मि.लि. 100 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 मिनिटे बुडवून ठेवावीत. नंतर लागण करावी.
दोन डोळा पद्धतीने लागण केल्यास हेक्‍टरी 25,000 टिपरी लागतात. एक डोळा पद्धतीने रोपे बनवून लागण केल्यास हेक्‍टरी 12,000 रोपे लागतात. रोपे लावायची असल्यास 100 ते 120 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून सरीत पाणी देऊन सरी भिजवावी. नंतर प्लॅस्टिक पिशवी काढून पिशवीतील रोप मातीसह सरीत हाताने दाबावे. दोन रोपांतील अंतर 45 ते 60 सें.मी. ठेवावे.

खत व्यवस्थापन –
शेतकऱ्यांनी मिश्र खतांऐवजी सरळ रासायनिक खतांचा वापर केल्यास स्फुरदसाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केल्यास गंधकाची अतिरिक्त मात्रा देण्याची गरज नाही. मात्र, मिश्र खते वापरल्यास हेक्‍टरी 60 किलो गंधकाची अतिरिक्त मात्रा वापरावी. महाराष्ट्रातील बहुतांशी जमिनीत लोह व जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. म्हणून हेक्‍टरी 25 किलो फेरस सल्फेट आणि 20 किलो झिंक सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना ती शेणखतात मुरवून नंतर सरीतून टाकावीत. शिफारस केलेली रासायनिक खते लागणीच्या वेळी जमिनीत पसरून न देता 4-5 सें.मी. खोल सरीत पेरून द्यावीत. ऍझॅटोबॅक्‍टर, ऍसिटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळणाऱ्याजिवाणू खतांचा वापर केल्यास नत्र व स्फुरद खतांच्या मात्रा (25 टक्‍क्‍यांपर्यंत) कमी कराव्यात. खते दिल्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे.
को. 86032 या उसाच्या जातीसाठी वर दिलेल्या खत मात्रेच्या 25 टक्के जादा खताची शिफारस केलेली आहे.

तण नियंत्रण व आंतरमशागत –
उसाची उगवण साधारण 15 ते 30 दिवसांपर्यंत चालू असते, तसेच सुरवातीचा ऊसवाढीचा काळ हा फार हळू असतो. या काळात तणांची वाढ फार जोरात होते. बाळबांधणीपर्यंत तणांचा बंदोबस्त करणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी बैलांच्या साह्याने अवजाराने तणनियंत्रण करता येते. त्याचबरोबर जमीन भुसभुशीत व हवा खेळती राहते, तसेच पावर टिलरनेसुद्धा तणनियंत्रण करता येते. त्यामुळे मजुरांकडून तण काढण्याचा खर्च कमी करता येतो. यासाठी अट्रॉटाप हे तणनाशक ऊस लागणीनंतर 2-3 दिवसांनी जमिनीत ओल असताना 5 किलो 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्‍टरी फवारावे. याशिवाय उसासाठी सेंकार या तणनाशकाचा वापर करता येईल. यासाठी हेक्‍टरी 1 किलो सेंकार 500 लिटर पाण्यातून ऊस लागवडीनंतर 2 ते 3 दिवसांनी जमिनीत ओल असताना फिरवावे.

तणनाशकांचा वापर, अवजारांचा वापर, तसेच 3-4 खुरपण्या केल्यास तणांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येतो. अवजारांच्या वापरामध्ये दातेरी कोळपे, कृषिराज, लोखंडी नांगर, सायण कुळव यांचा वापर आवश्‍यक आहे. ऊस पीक दीड ते दोन महिन्यांचे झाल्यावर नत्र खताचा दुसरा हप्ता सरीत देऊन कृषिराज अथवा दातेरी कोळपे चालवावे. त्यामुळे तणांचा बंदोबस्त चांगला होतो. पाणी धारणशक्ती वाढते. बाळबांधणी तीन ते साडेतीन महिन्यांनी करावी. या दरम्यान नत्र खताचा तिसरा हप्ता देऊन उसास हलकीशी भर द्यावी. यालाच बाळबांधणी म्हणतात. यासाठी कृषिराज, दातेरी कुळव या साधनांचा वापर करावा. यामुळे काही प्रमाणात खोड किडीचा बंदोबस्त होतो. ऊस पिकाची पक्की बांधणी किंवा मोठी बांधणी चार ते साडेचार महिन्यांनी पिकास 2-3 कांड्या सुटण्याच्या अवस्थेत असताना करावी. या वेळी शेवटचा रासायनिक खताचा हप्ता द्यावा. लोखंडी नांगराने वरंबे संपूर्ण फोडून घ्यावेत. उसाच्या बुंध्यास माती लावून सऱ्या पाट बांधून घ्यावे. त्यामुळे सरीत पाणीही व्यवस्थित बसेल. उसाचा जारवा तुटून उसाची वाढ जोरात होते.


पाण्याचा जास्त वापर हा बहुसंख्य ऊस बागायतदारांचा (विशेषतः कॅनॉल भाग) स्थायीभाग झाला असून, त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी फार वर येऊन अशा जमिनी क्षारयुक्त, विम्ल व दलदलीच्या बनल्याने त्या नापीक बनण्याचे प्रमाण सारखे वाढत आहे, म्हणून ऊस पिकासाठी पाण्याचा जास्त वापर टाळावा.
उसाला दिलेल्या नत्र खताची मात्रा वाया जाऊ नये, म्हणून ऊस उगवण अवस्थेमध्ये सुरवातीच्या काळात वरंबा बुडेपर्यंत पाणी देऊ नये, असे केल्याने जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो, मुळांची वाढ व कार्यक्षमता योग्य राहते.

ऊसाचे एकरी ऊत्पादन वाढवण्यासाठी माती तपासणी तंत्राचा अवलंब करून खत व्यवस्थापन करावे त्यासाठी खालील सूत्राचा वापर करावा.
अ. रासायनिक खतातून द्यावयाचे नत्र कि/हे ( 4.39 अपेक्षित ऊत्पादन टन / हे ) – ( 1.56 जमिनीतील ऊपलब्ध नत्र कि / हे)
ब. रासायनिक खतातून द्यावयाचे स्फुरद कि/हे ( 1.62 अपेक्षित ऊत्पादन टन / हे ) – ( 4.56 जमिनीतील ऊपलब्ध स्फुरद कि / हे)
क. रासायनिक खतातून द्यावयाचे पलाश कि/हे ( 1.86 अपेक्षित ऊत्पादन टन / हे ) – (0.37 जमिनीतील ऊपलब्ध नत्र कि / हे)
ड. रासायनिक खतासोबत सेद्रिय खताचे प्रमाणही वाढवावे हिरवळीचे पीक घ्यावे. जीवाणू खताचावापर करावा व सुक्ष्म अन्न द्रव्याचा वापरही करावे.
ई. पाणी योग्य प्रमाणात व वेळेत द्यावेत.

एकरी १०० टन उत्पादनासाठी हे करा –
१) एक किंवा दोन डोळ्यांची कांडी आणि रोपाद्वारेच उसाची लागवड करा.
२) दोन कांड्यांमध्ये/ रोपांमध्ये योग्य अंतर ठेवूनच लागवड करा.
३) शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा प्रामुख्याने वापर करा.
४) फुटवे व्यवस्थापन सूत्राचा वापर करून जादाचे फुटवे काढून टाका.
५) रासायनिक खते सुधारित खत घालण्याच्या पहारीचा वापर करूनच द्या.
६) पट्टा पद्धतीने किंवा ३.५ फुटांपेक्षा जास्त अंतरावर सऱ्या सोडून लागवड करा.

हे करू नका –
१) तीन डोळ्यांची कांडी तसेच खोडवा ऊस लागवडीसाठी वापरू नका.
२) टक्कर पद्धतीने लागवड करू नका.
३) उसाचा पाला जनावरांकरिता कोणत्याही परिस्थितीत काढू नका.
४) केवळ युरिया खताचा वापर करू नका.
५) मोकाट पद्धतीने सऱ्या भरून पाणी देऊ नका.

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj